भारतरत्न सर मोक्ष गुंडम विश्वेश्वरैय्या (नागपूर)

India / Maharashtra / Nagpur / नागपूर
 Upload a photo

१५ सप्टेंबर हा भारतरत्न विश्वेश्वरैय्या यांचा जन्मदिवस, तो 'अभियंता दिन' म्हणून साजरा केला जातो. अभियांत्रिकी क्षेत्रातील त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना विशिष्ट चौकटीत बंदिस्त करून चालणार नाही. स्वातंत्र्यपूर्व काळात तसेच स्वातंत्र्यानंतरही देशाच्या विकासासाठी आणि उद्यमशील समाजव्यवस्थेसाठी त्यांनी अहोरात्र प्रयत्न केले. एक प्रखर राष्ट्रभक्त, द्रष्टा उद्योजक, शिक्षण सुधारक, प्रशासन व्यवस्थेत एफिशियन्सी ऑडिट (कार्यक्षमता परीक्षण) हा प्रकार अवलंबणारा खंबीर प्रशासक, कृषी, औद्योगिक धोरणाचा संकल्पनाकार अशा विविध जबाबदाऱ्या कार्यक्षमपणे त्यांनी पार पाडल्या. केवळ अभियांत्रिकी तांत्रिक विश्वात अडकून न पडता सामाजिक उद्दिष्टे आणि विकास यांचा पुरस्कार केला. अखेरच्या क्षणापर्यंत त्यांची ही धडपड अखंडपणे सुरू होती. पुणे अभियांत्रिकी महाविद्यालयामधून १८८४ मध्ये इंजिनीअरची पदवी घेऊन बाहेर पडल्यानंतर ते सरकारी सेवेत रुजू झाले. १९०९ पर्यंत त्यांनी अधीक्षक अभियंता पदापर्यंत काम केले. मुख्य अभियंता हे पद केवळ ब्रिटिशांसाठी आरक्षित असल्याने पात्रता असूनही आपणास ते मिळणार नाही म्हणून आत्मसन्मानार्थ त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला.
यानंतरच त्यांची खरी कारकीर्द सुरु झाली. त्यांनी अनेक देशांना भेटी दिल्या. तेथील परिस्थितीचे अवलोकन केले. आपल्या देशातील उपलब्ध मनुष्यबळ आणि वातावरण यामध्ये कोणते उद्योगधंदे सुरू करता येतील याचा अभ्यास केला. हे त्यांचे द्रष्टेपण होते. म्हैसूरचे राजे श्रीमंत कृष्णराज वाडियार यांनी त्यांना मुख्य अभियंता म्हणून नेमले. म्हैसूरचा विविध क्षेत्रांत वेगाने विकास झाला. विश्वेश्वरैय्या यांचे व्यक्तिमत्त्व, कार्यतत्परता आणि लोकोपयोगी कामांचा उरक बघून तीनच वर्षांत ते म्हैसूरचे प्रमुख दिवाण झाले. आपल्या कारकिर्दीत त्यांनी संस्थानचा कायापालट केला.
कृष्णराजसागर धरण, त्यावरील वीजनिर्मिती याहीपेक्षा वृंदावन गार्डनच्या रूपाने भूतलावरील स्वर्ग निर्माण केला. मूलभूत आणि पायाभूत सुविधांमध्ये रेल्वे, दळवळण, रस्ते अशा कामांना चालना दिली. भद्रावती आयर्न अॅण्ड स्टील हा कारखाना, प्रीमियर ऑटोमोबाइल्स, हिंदुस्थान एरोनॉटिक्स हा विमानाचा कारखाना, सिमेंटनिर्मिती, साखर उद्योग, चंदन तेल तसेच म्हैसूर सोप फॅक्टरी अशा अनेक उद्योगधंद्यांचा त्यांनी पाया घातला. जगातील विविध देशांना भेटी दिल्यानंतर शिक्षण हे देशाच्या प्रगतीसाठी रामबाण औषध आहे हे त्यांच्या लक्षात आले. औद्योगिक वाढीसाठी जपानसारख्या देशाने शिक्षणाची कास धरली. पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रात्यक्षिक शिक्षण याचबरोबर अल्पवेतनात शिकवणारे शिक्षक हे पाहून ते भारावून गेले. रोजगारनिर्मितीसाठी औद्योगिकीकरणाची गरज लक्षात आली. प्राथमिक शिक्षणाचा पाया विस्तृत करण्याबरोबरच चांगले कारागीर तयार करण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि शेतीशाळा काढल्या. म्हैसूर विद्यापीठाची स्थापना आणि बेंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्युट ऑफ सायन्स हा त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील कामगिरीचा कळस ठरावा.
१०२ वर्षे आयुष्यमान लाभलेले विश्वेश्वरैय्या अखेरच्या श्वासापर्यंत कार्यरत होते. वयाच्या ९२व्या वर्षी गंगा नदीवरील आशिया खंडातील सर्वांत मोठ्या पुलासाठी त्यांनी सल्ला दिला होता. वयाच्या ५०व्या वर्षी निवृत्तीचे वेध लागणाऱ्या व सेवानिवृत्तीची वाट पाहणाऱ्यांनी हा आदर्श नजरेपुढे ठेवण्यासारखा आहे.
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   21°7'22"N   79°3'5"E
This article was last modified 11 वर्षांपूर्वी