जीवदानी डोंगर,श्री जीवदानी ही विरारची ग्रामदेवता (विरार)

India / Maharashtra / Virar / विरार
 मंदीर, hilltop (en)

मुंबईजवळच्या विरारची जीवदानी देवी ज्या डोंगरावर निवास करते, तो शिवकालातला जीवधन किल्ला आहे. आज हा परिसर हिरवागार झाला आहे. हे लाखो भक्तांच्या श्रद्धेचे स्थान आहे. नव्याने झालेली भव्य इमारत आणि ट्रस्टची अनेक सामा​जिक कामे, अशा प्रसन्न वातावरणात भाविकांना जीवनदानीची वाढती ओढ लागते आहे...

विरार पूर्वेला रेल्वे स्टेशनपासून साधारण दीड किलोमीटर अंतरावर जीवदानी डोंगर आहे. आज जीवदानीचा डोंगर म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या या गडावर १७ व्या शतकाच्या सुमारास जीवधन किल्ला होता. येथे आज तटाचे काही कोरीव दगड आढळतात. कालौघात या ऐतिहासिक किल्ल्याचे अस्तित्व नष्ट झाले. अज्ञात शिल्पकारांनी तयार केलेल्या गुंफा आजही येथे आहेत. हे पांडवकालीन मंदिर असल्याचे भाविक सांगतात. श्री जीवदानी ही विरारची ग्रामदेवता असली तरी या स्थानाची कीर्ती राज्यभर पसरली आहे आणि भक्तिमार्गाच्या पाऊलखुणा अभिमानाने मिरवते आहे.

जीवदानी मातेचे वास्तव्य केव्हापासून आहे, हे कोणी सांगू शकत नाही. मातेच्या वास्तव्याच्या अनेक आख्यायिका आहेत. गडाच्या पायथ्याशी शेतात अनोळखी गाय नित्यनेमाने चरण्यासाठी येत असे. पण ती गाय कोणाची हे समजले नाही. दिवसभर ती चरायची आणि संध्यासमयी निघून जायची. एक दिवस शेताचा मालक त्या गायीच्या पाठोपाठ जाऊ लागला. ती गाय पूर्वेकडील डोंगरावर चढू लागली. तसा तोही डोंगर चढून गेला. डोंगरावर जिथे मैदानी जागा होती तिथे ती गाय थांबली. त्याचक्षणी तेजस्वी स्त्री तिथे प्रकटली. शेतकऱ्याला वाटले हीच त्या गायीची मालकीण असावी, त्याने तिच्याजवळ चाऱ्याचे पैसे मागितले. पैसे काढून त्या शेतकऱ्याच्या हातावर ठेवणार तोच तो म्हणाला, 'बाई, मी अस्पृश्य आहे. मला स्पर्श करू नकोस.' हे शब्द कानावर पडताच ती स्त्री नाहीशी झाली. शेतकरी अवाक् झाला. त्याचक्षणी गायीने हृदयविदारक हंबरडा फोडला आणि कड्यावरून स्वत:ला झोकून दिले. या बलिदानाचे रहस्य अजून कोणाला उलगडले नाही. पण तिने आपल्या जीवाचे दान केले म्हणून या डोंगराला जीवदानीचा डोंगर व तेथे वास करणारी आदिमाता म्हणून जीवदानी देवी प्रसिद्ध झाली. जीवदान देणारी देवी म्हणूनही भाविकांची श्रद्धा आहे. जीवदानीचा डोंगर हा वनखात्याचा असला तरी वनीकरणासाठी ट्रस्टला देण्यात आला आहे. १९४६ ते ५६ या काळात बारकीबाय नावाची भक्त रोज गडावर जाऊन नेमाने देवीची पूजा करीत असे. त्यानंतर १९५६ मध्ये देवीच्या भक्तांनी मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली. सौम्य शीतल, प्रसन्न अशा या मूर्तीच्या डाव्या हाती कमलपुष्प आहे. तर उजव्या हाताने माता भाविकांना आशीर्वाद देत आहे. त्यापूर्वी देवीची लाकडी मूर्ती होती. २३ फेब्रुवारी १९५६ मध्ये जीवदानी मंदिर ट्रस्टची स्थापना झाली.
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   19°27'59"N   72°49'38"E
  •  35 किमी.
  •  113 किमी.
  •  136 किमी.
  •  201 किमी.
  •  423 किमी.
  •  607 किमी.
  •  848 किमी.
  •  884 किमी.
  •  953 किमी.
  •  1025 किमी.
This article was last modified 10 वर्षांपूर्वी