किल्ले वेताळवाडी

India / Maharashtra / Soyagaon /
 ऐतिहासिक, तटबंदी, डोंगरी किल्ला, विशेष जागा

वेताळवाडी गाव जसजसं जवळ येत होतं, तसे समोरच्या डोंगरावरचे तट-बुरुजांचे लक्षवेधी अवशेष दिसू लागले. त्यामुळे कुतूहल अधिकच वाढू लागलं. मग गाव ओलांडत, त्याच डोंगराला वळसा मारून वळणदार हळद्या घाटानं गाडी थेट किल्ल्याच्या दक्षिण पायथ्याशी येऊन थांबली. दक्षिणेची सलग तटबंदी आणि टप्प्याटप्प्यावर लहान-मोठ्या बुरूजांचं कोंदण फारच लक्षवेधी होतं. जसजसे किल्याच्या दिशेनं पुढे जाऊ लागलो तसं किल्याचं सौंदर्य अधिकच खुलू लागलं.
पहिल्या महादरवाज्यात पाऊल पडताच करकरीत तटबंदी, अवाढव्य बुरूजांचा भरभक्कम पहारा, बुरूजांच्या आतमध्ये असलेली दारू कोठाराची अनोखी रचना पाहून सगळेच अचंबित झालो. कितीतरी वेळ नि:शब्द शांतता होती. मुख्य द्वारावरील व्याघ्रशिल्पही उत्तम होतं. विशेष म्हणजे, ते चांगल्या अवस्थेत होतं.
पहारेकऱ्यांच्या देवड्याही अगदी एैसपैस. शत्रूवर मारा करण्यासाठी प्रत्येक तट-बुरूजात जंग्या ठेवलेल्या. तसंच, विविध जागी गुप्त खिडक्याही पाहायला मिळाल्या. हे सगळं डोळ्यांत साठवत बालेकिल्याकडे निघालो. डावीकडे वटवाघळांच्या वास्तव्याचं खांबटाके लागलं. पुढं उजवीकडे पहारेकऱ्यांच्या शानदार बुरूजानं आमचं स्वागत केलं. इतकी भक्कम, चिलखती तसंच कलात्मक तटबंदीची व्यूहरचना फार कमी किल्यांना लाभली आहे. त्या ठिकाणाहून पूर्ण १८० डिग्रीचा मनोहारी मुलूख दृष्टीपटात घेत माथ्यावर आलो. समोर सुंदर नक्षीकाम असणारी, गोल झरोका असणारी घुमटासारखी उध्वस्त वास्तू दिसली. माथ्यावर सर्वत्र सीताफळाची झाडं पसरली होती. त्यांची छाया मन शांत करणारी ठरली.
बालेकिल्ला तसा दक्षिणोत्तर लंबवर्तुळाकार आहे. अंबरखान्याची इमारत फारच सुरेख होती. अलीकडे काही अंतर असलेली नमाजगीर नावाची इमारत सुंदर नक्षीकामानं सजलेली दिसली. उध्वस्त अवस्थेतही इमारत इतकी सुंदर होती, की वैभवकाळात तिची काय शान असेल ही कल्पना प्रत्येकजण करत होता. पुढ्यात गोलाकार तलाव होता, तोही बांधीव. उत्तरेला धावत सुटलेल्या डोंगरधारेच्या टोकावर सुरेख कमानदार वास्तू दिसली. कमानीतून खाली दिसणारी वेताळवाडी अन् तिथून चौफेरचा नजराणा मन मोहून टाकत होता. कॅमेऱ्याचा हट्ट पुरवत बराच वेळ तिथं खर्ची घातला.खालच्या टप्प्यावर पुन्हा तटबंदी, बुरूजांचा लवाजमा नेत्रसुख देत होता. मग तिथून पुन्हा आल्या वाटेनं परतून पश्चिमेकडे निघालो. तिथला महाकाय बुरूज अन् अवाढव्य द्वारांची बांधकाम शैली भव्यदिव्य होती. आकारानं मध्यम असूनही कातळशिल्पांनी अगदी मनापासून सजवलेला हा किल्ला असल्याचं जाणवत होतं. तिथून पावलं निघतच नव्हती. पश्चिमेला वेताळवाडी धरणाचं विहंगम असं दृष्य, पलीकडचा वैशागड आमची वाट बघत असल्याची वर्दी आली अन् जड पावलांनी परतीला निघालो. इतकी अप्रतिम तटबंदी आणि बुरूजांचं मायाजाल मी फार कमी किल्ल्यांवर अनुभवलं होतं.
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   20°33'15"N   75°37'17"E
This article was last modified 10 वर्षांपूर्वी