लाकडी गणपती (खामगांव)

India / Maharashtra / Khamgaon / खामगांव
 मंदीर, गणेश / गणपती मंदिर
 Upload a photo

गावातील मानाचा लाकडी गणपती पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. खामगावकरांचे आराध्य दैवत आहे. साधारण दीडशे वर्षांपूर्वी त्याची प्राणप्रतिष्ठा करण्यात आल्याचे सांगितले जाते. तेव्हापासून आजपर्यंत येथील गणेशोत्सव व वर्षभरातील कार्यक्रमांना भाविकांची मोठी गर्दी असते. महाराष्ट्राच्या विविध भागातील भाविकांसोबतच मध्य प्रदेश, गुजरात आणि छत्तीसगड येथील भाविकही या गणपतीच्या दर्शनासाठी गर्दी करतात. अतिशय रेखीव व तेवढीच देखणी असलेली ही गणेशमूर्ती अखंड लाकडातून साकारण्यात आली आहे. सहा फूट उंच ही गणेशमूर्ती काष्ठशिल्पाचा उत्कृष्ट नमुना आहे. लाकडी गणपतीचे मुकुट, त्याचे कान, सोंडेवरील नक्षीकाम आणि मूषकराज हे खास चांदीने मढविण्यात आले आहेत. त्यामुळे मूर्तीचे रूप आणखी देखणे झाले आहे. संपूर्ण लाकडापासून तयार केलेली गणेशाची मूर्ती महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यात क्वचितच आढळेल.

मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी; दुरूनच या गणेशाचे दर्शन घडते. पाहता क्षणीच ही मूर्ती मनात घर करते. मंदिर परिसरातील वातावरण अतिशय आनंदी आणि मनाला शांती देणारे आहे. गणेशोत्सव काळात मूर्तीच्या चेहऱ्यावरील भाव बदल असल्याचीही काही भाविकांची श्रद्धा आहे. हा गणपती कसा तयार झाला याच्या दोन आख्यायिका आहेत. काहींच्या मते दीडशे वर्षांपूर्वी खामगाव शहराच्या मध्यभागातून वाहणारी बोर्डी नदी आणि आताच्या फरशी नाल्याला मोठा पूर आला होता. त्या पुरात लाकडाचा एक मोठा ओंडका वाहत आला. गावकऱ्यांना तो ओंडका गणपतीच्या आकाराचा असल्याचा जाणवला. तो पाण्यातून बाहेर काढला असता हुबेहूब गणपतीच असल्याचे आढळल्याने. गावकऱ्यांनी या गणपतीची प्राणप्रतिष्ठा केली. दुसऱ्या आख्यायिकेनुसार खामगावातील फरशी भागातील अय्याची कोठी भागात दक्षिणेकडून आलेले आचारी राहत होते. त्यांनी खास लाकडापासून हा सुरेख गणपती तयार करून घेतला. दीडशे वर्षांपूर्वी लाकडाच्याच एका मंदिरात त्याची प्रतिष्ठापना केली. आजचे मंदिर याच अय्याची कोठी भागात आहे. नंतरच्या काळात सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाल्यानंतर निघणाऱ्या विसर्जन मिरवणुकीत त्याला मानाचे स्थान देण्यात आले.

अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जन मिरवणुकीत लाकडी गणेश पहिला असतो. पण त्याचे विसर्जन केले जात नाही. त्या दिवशी केवळ हलविला जातो. ठरल्या मार्गावरून शोभायात्रा फिरल्यानंतर हा गणपती परत मंदिरात आणण्यात येतो. खामगावातील गणेशोत्सव अतिशय शांततेत कसा पार पडेल आणि अन्य गणेश मंडळांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेत लाकडी गणपती निर्धारित वेळेतच फरशीवर आणण्यात येतो. सर्व गणेश मंडळांच्या मिरवणुकीचे नेतृत्त्व याच गणपतीकडे असल्याने ते निर्विघ्न आणि वेळेत पार पाडण्याची काळजी लाकडी गणेश मंडळ घेते. एरवी मिरवणुकीचा जल्लोष असतो...'गणपती बाप्पा मोरयाऽऽ, पुढच्या वर्षी लवकर याऽऽ'चा जयघोष होतो मात्र उत्सवाचा अतिरेक केला जात नाही. शिस्तीत जल्लोष आण‌ि शांततेत उत्सव साजरा करण्याची प्रेरणा कार्यकर्त्यांना मिळते. या आधुनिक काळात या गणपतीची विसर्जनाची प्रतीकात्मक मिरवणूक ही ट्रॅक्टरवर निघत नाही. बैलबंडीतच काढली जाते. उत्सव साजरा करावा पण निसर्ग आणि देवतांचा पूर्ण मान राखून हा भाव कायम जपला जातो.

स्वातंत्र्यानंतर खामगावकरांनी या गणपतीकडे विशेष लक्ष दिले. त्यावेळी खामगावातील व्यापारी मंडळी विशेषत: अडत व्यापाऱ्यांनी या मंदिरासाठी पुढाकार घेतला. त्यावेळच्या विश्वस्त मंडळात जयनारायण नंदलाल, माताशरण दुबे, त्र्यंबकलाल पुरवार, दत्तात्रय उपाख्य नानासाहेब वरणगावकर, एकनाथ जयराम, गंगाधर पिवळटकर आणि भिकाजी निंबाजी यांनी काम पाहिले. १९९५ साली धर्मादाय आयुक्तांनी आर. बी. अग्रवाल व त्यांच्या सहकाऱ्यांना या मंदिराचे व्यवस्थापन सोपविले. सध्या या मंडळाचे व्यवस्थापन उपाध्यक्ष अॅड. व्ही. वाय. देशमुख, व्यवस्थापक अग्रवाल, सचिव शेखर पुरोहित, सदस्य दिनेश अग्रवाल, कैलास अग्रवाल आणि त्यांचे सहकारी करीत आहेत. सुरुवातीला छोट्याशा जागेत असलेल्या या मंदिराचा १९९७ साली जीर्णोद्धार करण्यात आला. कमीत कमी जागेत जास्तीत जास्त भाविकांना सामावून घेणारी व्यवस्था निर्माण करण्यात आली. मंदिर परिसर चिंचोळा असला तरी भाविकांना कमीत कमी त्रास होतो. दर्शनाच्यावेळी शिस्त पाळली जाते. रांगेतील भाविक अन्य भाविकांना त्रास होणार नाही याची काळजी घेतात. गणेशोत्सव काळात दहाही दिवस भाविकांची गर्दी असते. दर महिन्यात संकष्ट चतुर्थीलासुद्धा मोठी गर्दी असते. खामगावकरांचे आराध्य दैवत असलेल्या लाकडी गणपतीशी भाविकांच्या भावना जुळल्या आहेत. दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात खामगावातून बाहेरगावी नोकरी, व्यवसायानिमित्त गेलेले नागरिकही येथे दर्शनासाठी येतात.
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   20°42'14"N   76°33'49"E
  •  307 किमी.
  •  378 किमी.
  •  387 किमी.
  •  404 किमी.
  •  412 किमी.
  •  738 किमी.
  •  838 किमी.
  •  926 किमी.
  •  1010 किमी.
  •  1042 किमी.
This article was last modified 11 वर्षांपूर्वी