लोणार सरोवर

India / Maharashtra / Lonar /
 ऐतिहासिक, विशेष जागा, crater lake (en)

या चमत्कृत लोणार सरोवराचा शोध १८२३ साली ब्रिटिश लष्करी अधिकारी सर सी. जी. ई. अलेक्झांडर यांनी लावला आणि त्यानंतर जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना झाली.
लोणार सरोवराची उत्पत्ती जवळपास ५०,००० वर्षांपूर्वी झाली जेव्हा २० लाख टन वजनाचा एक उल्कापाषाण प्रचंड वेगाने पृथ्वीवर आदळून १५० मीटर खोल व १.८३ किलोमीटर रुंद असा खड्डा भूपृष्ठावर पडला, तेच हे लोणारचे सरोवर. या सरोवराच्या आजुबाजुला सर्वत्र वाळू आणि औषधी वनस्पती आढळतात. याच्या परिसरात अनेक मौल्यवान दगड , चुंबकीय खडक, स्फटिके आढळतात. लोणार सरोवर हा भूगर्भीय रचनेचा उत्तम नमुना समजला जातो कारण ते नैसर्गिक वैभवाचे सुंदर प्रतिक आहे.पृथ्वीतलावरील अग्नीजन्य खडकातील एकमेव अशनीपात विवर असलेले लोणारचे खाऱ्या पाण्याचे सरोवर म्हणजे अद्वितीय , अद‍्भुत आणि सर्वांसाठी रहस्यमय असणारा , निसर्गाने दिलेला अनमोल ठेवा आहे. त्या अशनीपातात पृथ्वीतलावर चार विवरे तयार झाली. त्यामध्ये अॅरिझोना (अमेरिका) , ओडेसा (अमेरिका) , बोक्सव्होले (ऑस्ट्रेलिया) आणि लोणार (भारत) यांचा समावेश आहे. पृथ्वीच्या पाठीवर अग्नीजन्य खडकातील लोणार हे सध्याचे एकमेव विवर आहे. लोणारच्या खाऱ्या पाण्याच्या सरोवराच्यानिमिर्तीबाबत विविध मतप्रवाह आहेत. लोणारच्या सरोवराला वैज्ञानिक तसेच पौराणिक , ऐतिहासिक संदर्भ लाभलेले आहेत. पद्म पुराण , स्कंध पुराण या प्राचीन ग्रंथांतही या विवराचा संदर्भ आढळतो. पुरातन काळाप्रमाणेच आधुनिक काळातही या सरोवराचे रहस्य कायम आहे.

या सरोवराची सुमारे ५० हजार वर्षांपूर्वी निर्मिती झाल्याचे मानले जाते. विवराची सरासरी खोली १५० मीटर , कमाल खोली ५०० मीटर , उंची १३७ मीटर आहे. व्यास १.८३ किमी आहे. पृष्ठभागाचे क्षेत्रफळ १८०० मीटर आहे. यात मॅस्केलनाइट , काचमणी ही खनिजे तसेच पाण्यावर तरंगणारे सच्छिद्र दगडही आढळतात. या सरोवरनिर्मितीबाबत वैज्ञानिक क्षेत्रात महत्त्वाचे दोन मतप्रवाह आहेत. लोणार सरोवराची निर्मिती साडेसहा लाख वर्षांपूर्वी ज्वालामुखीच्या उद्रेकातून झाल्याचे काही वैज्ञानिकांनी सिद्धांत मांडले आहेत. ' जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया ' या संस्थेने केलेल्या अभ्यासात हे सरोवर उल्कापातातून निर्माण झाल्याचे मांडण्यात आले. उल्कापाताचा काळ सुमारे ५० ते ६० हजार वर्षांपूर्वीचा असावा , असेही मत मांडण्यात आले. लोणार सरोवराच्या परिसरात सापडलेली काच स्फटिके आणि चंद्रावरील काच स्फटिके यांच्यात साधर्म्य असल्याचे रासायनिक पृथ्थकरणावरून स्पष्ट झाले आहे. हे सरोवर ' नासा ' सह जगातील बऱ्याच संशोधन संस्थांच्या औत्सुक्याचा विषय राहिले आहे. चंद्र आणि मंगळावरील विवरांचा अभ्यास करण्यासाठी ते उपयोगी ठरत असल्याने या विवराचे आकर्षण आणि महत्त्व अधिक.

सरोवरात १४ प्रकारचे हरित नील शैवाळ , औषधी वनस्पती व इतर वनस्पतींचे ७२ प्रकार आढळतात. विशेष म्हणजे , पॉलिथिन विरघळणारे हे एकमेव खाऱ्या पाण्याचे हे सरोवर आहे. आकाशगंगेतील खगोलीय घडामोडीतून हजारो वर्षांपूर्वी निर्माण झालेल्या लोणार सरोवर पर्यावरणाचा समृद्ध वारसा आहे. सरोवर परिसरात जैवविविधता विपुल प्रमाणात आहे. खाऱ्या पाण्यापासून पूर्वी खार , मीठ तयार केले जात होते. साबण , काच निर्मिती केली जात होती. नैसर्गिकरीत्या तयार झालेल्या सरोवराच्या भोवताली हिरवीकंच वनराई असून त्यामध्ये शेकडो वनऔषधी , जीव , वन्यप्राण्यांचा वावर आहे.लोणार सरोवराला धार्मिक महत्त्वही आहे. पौराणिक संदर्भांचा विचार केल्यास या सरोवराचा पहिला संदर्भ ऋग्वेदामध्ये आला आहे. लोणारला दंडकारण्य म्हणूनही ओळखले जाते. सत्ययुगाच्या काळातील लवणासुराचा वध विष्णूने याच ठिकाणी केल्याची आख्यायिका आहे. येथील भोगावती कुंडात भगवान रामाने स्नान केले होते. पांडवांच्या काळात युधिष्ठिराने येथे वडिलांचे श्राद्ध केले होते , असेही सांगितले जाते. भारतीय पुराणात लोणार सरोवर आणि परिसराला कपिलतीर्थ , विरजतीर्थ , धारातीर्थ , नाभीतीर्थ , तारातीर्थ , पवित्रतीर्थ , पद्मसरोवर , पंचाप्सर आदी विविध नावे आहेत. स्कंद पुराणात ब्रह्मदेव , नारदमुनी , कपिलमुनी , अगस्तीऋषी , भृगुऋषी , याज्ञवल्क , शुक्राचार्य आदी ऋषीमुनींनी लोणार सरोवर परिसरात तपश्चर्या केल्याचा उल्लेख आहे. कमळजा देवी मंदिर , दैत्यसूदन मंदिर , शंकर गणेश मंदिर , रामगया मंदिर , विष्णू मंदिर , वाघ महादेव मंदिर , मोर मंदिर , अंबरखाना मंदिर , कुमारेश्वर , पापहरेश्वर , सीता न्हाणी , शुक्राचार्याची वेधशाळा , याज्ञ वल्केश्वर , धारेजवळील मंदिर , ब्रह्मकुंड , यमतीर्थ , लोणारची धार , उंबरझिरा (औदुंबरतीर्थ) , सोमतीर्थ , लिंबी बारव (वायूतीर्थ) , अगस्तीतीर्थ , त्रिपुरुषांचा मठ , आडवा मारोती आदी मंदिरांनी लोणार नगरी समृद्ध आहे. सम्राट अशोक , वाकाटक , सातवहन , चालुक्य यांच्या काळात या सरोवर परिसरातील विविध मंदिरांची निर्मिती झाली. जैन राजांनीसुद्धा मंदिरे बांधली आहेत. यादवांनी मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी पुढाकार घेतला. राजा अकबरच्या काळात लोणार नगरीचा ' जिझीया कर ' रद्द करण्यात आल्याने लोणारचे आकर्षण वाढले होते. निझाम व पेशव्यांच्या काळातही लोणारचा विकास झाला. ब्रिटिश काळात कर्नल मॅकेन्झीने लोणारचा सविस्तर अभ्यास केला. त्याच्या नोंदीनुसार , तेव्हा लोणारला ३२ मंदिरे , १७ स्मारके , १३ कुंड आणि पाच शिलालेख होते.
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   19°58'35"N   76°30'29"E
  •  294 किमी.
  •  320 किमी.
  •  329 किमी.
  •  381 किमी.
  •  420 किमी.
  •  750 किमी.
  •  758 किमी.
  •  845 किमी.
  •  931 किमी.
  •  961 किमी.
This article was last modified 10 वर्षांपूर्वी