उनपदेव' येथील गरम पाण्याचे झरे

India / Maharashtra / Chopda /
 मंदीर, hot spring (en)
 Upload a photo

वैविध्यतेने नटलेल्या खान्देशच्या भूमीत निसर्गाचा अनमोल खजिना दडलेला आहे. या परिसराला लाभलेल्या वैभवात सातपुडा पर्वतरांग, वनौषधींचे भांडार यासह निसर्गाचे विविध आविष्कार समाविष्ट आहेत. या आविष्कारांपैकी एक म्हणजे 'उनपदेव' येथील गरम पाण्याचे झरे. या झऱ्याच्या निर्मितीचा इतिहास सांगताना रामायणकालीन संदर्भही दिले जातात. त्यामुळे या स्थानाला प्राचीनतेची पार्श्वभूमीही लाभली आहे. या ठिकाणी स्नान केल्याने विविध आजारांपासून माणसाची मुक्तता होते, अशी श्रद्धा आजतागायत आहे. धर्मापासून विज्ञानप्रेमींनाही आकर्षित करणारं हे स्थळ आपलं आजचं वीकेंड डेस्टिनेशन आहे.

बाइक अथवा खासगी वाहन योग्य पर्याय

जळगाव जिल्ह्यात उनपदेव हे गरम पाण्याचे झरे व एक धार्मिक तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. चोपडा तालुक्यातील अडावद गावाच्या उत्तरेस तीन ते चार किलोमीटरवर हे ठिकाण आहे. जळगावपासून जवळपास ६० किलोमीटरवरील या डेस्टिनेशनवर पोहोचण्यासाठी रेल्वेमार्ग नसल्याने बस अथवा खासगी वाहन हे दोनच पर्याय आहेत; परंतु बस फक्त अडावद गावापर्यंत असल्याने उनपदेव जाण्यासाठी रिक्षा किंवा इतर खासगी वाहनांची मदत घ्यावी लागते. तसं पाहिल्यास जळगावपासून हे अंतर जास्त नसल्याने बाइकनेदेखील प्रवास सहज शक्य आहे, तर धुळे अथवा नंदुरबार येथूनही चोपडा किंवा यावल बसने अडावदला पोहोचू शकतात. अडावदपासून चोपड्याकडे जाताना गावालगतच उजव्या बाजूला उनपदेव फाटा लागतो. तेथून जवळपास तीन ते चार किलोमीटरवरील उनपदेवचा रस्ता काही ठिकाणी खराब, तर काही ठिकाणी चांगला आहे. तसंच वाटेत चढ-उतार व वळण रस्ता असल्याने बाइक अथवा कारने जाणाऱ्यांनी या रस्त्यावरून जाताना वेगावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.

उनपदेवचे सुशोभीकरण

पूर्वी दुर्लक्षित असलेल्या या परिसराचे नुकतेच वन विभागातर्फे सुशोभीकरण करण्यात आले आहे. प्र्रवेशद्वाराजवळच प्रशस्त वाहनतळाची व्यवस्था आहे. वाहनतळापासून मंदिरापर्यंत सिमेंटचा रस्ता करण्यात आला आहे. रस्त्याच्या दुतर्फा सुंदर फुलांची झाडे आहेत. त्याचप्रमाणे पर्यावरणसंदर्भातील संदेश देणारी फलकेही येथे लावण्यात आली आहेत.

पर्यटनस्थळ

उष्णोदकाचा म्हणजेच गरम पाण्याचा झरा उनपदेव येथे असल्याने हे ठिकाण प्रसिद्ध आहे. निसर्गरम्य उंच सातपुडा पर्वतातील पहिल्या पुड्याच्या पायथ्याशी असलेल्या उनपदेवचा परिसर आता एक पर्यटनस्थळ म्हणून नावारूपाला येत आहे. उत्तरेला उंच डोंगर आणि जंगलाचा परिसर असल्याने संपूर्ण परिसरात एक वेगळीच शांतता अनुभवयाला मिळते. दुर्मिळ पक्ष्यांचा सहवासदेखील या जंगलात लाभतो. येथे सागाची झाडे मोठ्या प्रमाणावर दिसतात. त्याचप्रमाणे या परिसरात आदिवासींची लहान लहान पाडेदेखील आहेत. दुय्यम मोठे स्नानकुंड, स्ट्रीट लाइट, वनभोजनासाठीची व्यवस्था, घनदाट वनराई, निसर्गरम्य बाग, फुलझाडे यामुळे या परिसराला महत्त्व प्राप्त झाले आहे.

गरम पाण्याचा झरा

परिसरात मुरलीधर (कृष्ण-बलराम), राम-सीता-लक्ष्मण, हनुमान, महादेव, गणपती आणि शनी या देवतांची मंदिरे आहेत. उत्तरेस टेकडीवर गोविंद महाराजांची समाधी आहे. मंदिराच्या खालच्या बाजूला भरीव दगडास लागून असलेल्या गोमुखातून साडेसात मीटर लांब व पावणेदोन मीटर उंचीच्या मोठ्या तांबड्या विटांमध्ये बांधलेल्या हौदात गरम पाणी पडते. १८७६ मध्ये हौदाच्या पूर्वेस स्थानिक निधीतून जनावरांसाठी एक कुंड बांधण्यात आल्याची नोंद आहे. गोमुखातून पडणाऱ्या पाण्याचे तापमान सुमारे ६० अंश सेल्सिअस असते. या पाण्याला चव नसून, त्यास विशिष्ट वास येतो. हा वास गंधकाचा असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या पाण्यात अंघोळ केल्यास आजार बरे होतात, असा समज आहे. बॉम्बे मेडिकल अँड फिजिकल सोसायटीने १८५४ मध्ये येथील पाण्याचे रासायनिक विश्लेषण केले होते; परंतु त्यात कोणतेही वैद्यकीय गुणधर्म नसल्याचे सांगितले जाते. पद्मालयच्या गोविंद महाराजांनी १९३२ मध्ये हौदाची दुरुस्ती केली. उष्णोदक झऱ्याजवळील कठीण दगडांमुळे त्याचे उगमस्थान समजू शकले नाही. पूर्वी हे स्थान त्रंबकेश्वर खालोखाल पवित्र मानले जात असल्याने भाविकांची मोठी गर्दी होत असे.

शरभृंग ऋषींची गुंफा

गरम पाण्याचा झरा असलेल्या हौदाच्या पश्चिम बाजूच्या लगतच जमिनीत शरभृंग ऋषींची गुंफा आहे. या गुंफेत महादेवाचे पिंड आहे. दगडात कोरण्यात आलेल्या या गुंफेत जाताना वेगळेच थ्रील अनुभवायला मिळते. आत गेल्यावर मात्र नितांत शांतता आणि गारवा जाणवतो. या गुंफेतून एका वेळेस फक्त एकच व्यक्ती आत किंवा बाहेर जाऊ शकते. नांदेड जिल्ह्यात किनवट तालुक्यातील उन्हकदेव येथेही उष्णोदकाचे झरे आहेत. तेथेही शरभंग ऋषींचे वास्तव्य असल्याची दंतकथा सांगितली जाते. पूर्वी बिहारमधील चंपारण्यातील शरभृंग संप्रदायाचे गोसावी मार्गशीर्ष महिन्यात उनपदेवहून पुढे उन्हकदेवला जात असत. उनपदेव येथे पौष महिन्यात यात्रोत्सव होत असतो. त्यामुळे अनेक भाविकांची यात्रोत्सोवात गर्दी होते.
प्राचीन गावाचे अवशेष
उनपदेवच्या परिसरात पूर्वी गाव असल्याचे म्हटले जाते. या परिसरात आजही काही ठिकाणी गावाचे अवशेष आढळतात; परंतु सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या या गावाचे स्थलांतर झाले की पुनर्वसन याबाबत कुठलीही माहिती नाही. परिसरात रामाचे वास्तव्य होते आणि शबरीने रामाला उष्टी बोरं खायला दिल्याची दंतकथादेखील याच ठिकाणची असल्याचे सांगितले जाते.
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   21°15'57"N   75°25'54"E
  •  225 किमी.
  •  281 किमी.
  •  346 किमी.
  •  346 किमी.
  •  502 किमी.
  •  613 किमी.
  •  919 किमी.
  •  996 किमी.
  •  1096 किमी.
  •  1102 किमी.
This article was last modified 11 वर्षांपूर्वी